`
6/ticker

बेलापुरात पाणीपुरवठा टाकीत प्रचंड गाळ ; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

https://ift.tt/Ws0MFTS

बेलापुर : पुढारी वृत्तसेवा :  बेलापूरला दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीने बैठक बोलाविली. यावेळी आजी, माजी सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ व कामगारांनी या समस्येचे निराकरण करण्याबाबत चर्चा केली, मात्र यानंतर जे धक्कादायक सत्य बाहेर आले ते समजल्यावर बरे झाले बैठक बोलाविली, असेच काहीसे म्हणावे लागले.  झाले असे की, गेल्या दोन- तीन महिन्यांपासून बेलापूरसह परिसराला दूषित पाणीपुरवठा होत होता. याप्रश्नी सदस्य भरत साळुंके, रवींद्र खटोड, सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. दूषित पाण्याचे नमुनेही व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर फिरले. गावकरी मंडळाचे मार्गदर्शक शरद नवले यांनी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना तातडीने कारण शोधण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, यावर उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चेसाठी सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांनी ग्रामस्थांची बैठक बोलाविली. या बैठकीतील चर्चेतून असे समोर आले की, अनेक वर्षांपासून पाण्याची टाकी स्वच्छ केली नाही. त्यामुळे तातडीने टाकी स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीने तातडीने टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली. यावेळी भयानक सत्य समोर आले. टाकीत तब्बल चार ते पाच फुटांपर्यंत गाळ साचलेला होता. विशेष असे की, हेच गाळमिश्रीत पाणी बेलापूरसह परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पित होते. या टाकीतील बर्‍याच वर्षांपासून साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मागील काळात टाकी केव्हा साफ करण्यात आली होती, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, टाकी स्वच्छ केल्याची तारीख, महिना अन् वर्षसुद्धा सापडले नाही. यावरून अनेक वर्षांपासून नागरिक हे गाळमिश्रीत पाणी पित होते हे उघड झाले.

दूषित पाण्यामुळे होणार्‍या आजाराचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे माहित असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष झाले. आरोग्य विभागही याबाबत अनभिज्ञ होता. पाण्याच्या टाकीत साचलेला प्रचंड गाळ वरून पडलेल्या पाण्यामुळे ढवळून निघत होता. तेच ढवळलेले गाळमिश्रीत पाणी नागरिकांना पिण्यास येत होते, हे वास्तव यानिमित्ताने समोर आले.  या प्रकाराबाबत सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांनी सांगितले की, बैठकीत झालेल्या चर्चेनुसार बेलापूर बु. ग्रामपंचायतीच्यावतीने 5 लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे व टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यानंतर 2 लाख लिटरची टाकी देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहे. मेन टाकीवरील पाण्याचे सर्व हौद देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहेत. याआधी अमरधाम, खटकळी-गावठाण,20 घरकुल, अयोध्या कॉलनी येथील पाण्याच्या टाक्या गाळ काढून स्वच्छ करण्यात आल्या.

The post बेलापुरात पाणीपुरवठा टाकीत प्रचंड गाळ ; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/tXxhNez
via IFTTT

Post a Comment

0 Comments