`

Ticker

6/recent/ticker-posts

रायगडात ग्रामीण प्रवाशांना मोठा दिलासा, एसटीची सेवा पूर्ववत, दररोज १ हजार ६९८ फेऱ्या सुरू

जवळपास साडेपाच महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विस्कळीत झालेली एसटीची सेवा हळुहळू पूर्वपदावर आली आहे. रायगड जिल्ह्यात एसटीच्या १ हजार ६९८ फेऱ्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल थांबले आहेत.

विलिनीकरण व इतर मागण्यांसाठी गेल्या दिवाळीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. संपाचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी ठाम होते. प्रकरण न्यायालयात गेले शेवटी न्यायालयाने कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात कामावर हजर होण्याचे निर्देश दिले. यानंतर संपकरी कर्मचारी कामावर परतले. यामुळे आता एसटीची सेवा हळुहळू पुर्वपदावर आली आहे. जिल्ह्यातून दररोज १ हजार ६९८ एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा

रायगड जिल्ह्यातील पेण ३४३, अलिबाग २२६, महाड १३२, श्रीवर्धन २००, कर्जत २३८, रोहा २३४, माणगाव २१३ आणि मुरुड ६९ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय कमी झाली आहे. एसटी संपामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी साधनांचा वापर करावा लागत होता.

खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांचं आर्थिक शोषण

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहतुकदारांनी दरही वाढवले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. आता एसटी बस सेवा सुरू झाल्याबरोबर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनीही दर कपात केली आहे. त्यामुळे प्रवाशांची लूटही थांबली आहे.

हेही वाचा : “बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही, त्यामुळे…”, सदावर्तेंची एसटी बँक निवडणुकीबाबत मोठी घोषणा

“दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार”

रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के म्हणाल्या, “एसटीची बस सेवा दिर्घकाळ बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. आता कर्मचारी कामावर परतल्याने एसटी सेवा जोमाने सुरू झाली आहे. फेऱ्याही वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”

https://ift.tt/X0jS6yW

Post a Comment

0 Comments