`

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर : महाविकास आघाडीला ‘स्वाभिमानी’चा धक्का; जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्यत्व नाकारले

महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजकीय संबंध अजूनही ताणलेलेच असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळात स्वाभिमानीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांचा समावेश केला होता. पण त्यांनी विश्वासघातकी महाविकासआघाडीशी नाते ठेवायचे नाही, असे कारण देत आज पदाचा राजीनामा सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे सादर केला.

सहा महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळाची यादी तयार करत असताना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मादनाईक यांच्या नावाचा समावेश करण्याचे निश्चित केले होते. मात्र गेल्या महिन्यात शेट्टी यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची मैत्री करायची नसल्याचा निर्णय घेत एकला चलो रे भूमिका ठेवली आहे. काल जिल्हा नियोजन मंडळाची यादी राज्य शासनाने जाहीर केली. त्यामध्ये मादनाईक यांच्या नावाचा समावेश होता.

मात्र स्वाभिमानीच्या राजकीय धोरणानुसार आज मादनाईक यांनी पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. त्यांच्यासमवेत शिरोळ तालुका अध्यक्ष शैलेश आडके, प्रकाश बंडगर होते.

राज्यातील आघाडी सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगार, पुरग्रस्त यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. उसाच्या एफआरपीची मोडतोड करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली आहे. अशा विश्वासघातकी आघाडीशी संगत नको, असे कारण देत मादनाईक यांनी राजीनामा दिला असल्याने या घडामोडीतून स्वाभिमानीने आघाडीला राजकीय धक्का दिल्याचे मानले जात आहे. यामागे राजू शेट्टी यांची सूचना कारणीभूत असल्याचेही सांगितले जाते.

https://ift.tt/hxKjA6F

Post a Comment

0 Comments