राज्यात दोन टप्प्यांत होणार निवडणुका? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर कार्यक्रमाची लवकरच होणार घोषणा!

May 13, 2022 0 Comments

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रासोबतच जगभरात करोना ठाण मांडून बसल्यामुळे सर्वच प्रकारचे व्यवहार विस्कळीत झाले होते. गेल्या काही महिन्यांत परिस्थिती पूर्वपदावर येत असताना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यासंदर्भात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पुढील १५ दिवसांत या निवडणुकांसंदर्भात अधिसूचना काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. मात्र, नेमक्या निवडणुका होणार कधी? याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या तारखांविषयी अद्याप मतमतांतरं असली, तरी या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका प्रलंबित राहिल्या आहेत. त्या आता होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार राज्यातील या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकांमध्ये एकूण १४ महापालिका आणि तब्बल २५ जिल्हा परिषदा असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

कोणत्या महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार?

राज्यातील नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, मुंबई आणि ठाणे या महानगर पालिकांची मुदत संपली असून त्यांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मुदत संपून सहा महिने किंवा एक वर्ष झालेल्या महापालिकांच्या निवडणुका होतील, तर दुसऱ्या टप्प्यात नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक होईल. यापैकी औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर आणि वसई-विरार महानगर पालिकांची मुदत २०२०मध्येच संपली आहे. तर नागपूर, अकोला, अमरावती, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, मुंबई आणि ठाणे या महापालिकांचा कार्यकाळ नुकताच २०२२मध्ये संपला आहे.

दरम्यान, येत्या १७ जून रोजी प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्यानंतरच ही सगळी प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर सोडत निघेल. त्यावरील हरकती, सूचना ही प्रक्रिया झाल्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध होतील. या सर्व प्रक्रियेला लागणारा वेळ पाहाता या निवडणुका ऐन पावसाळ्यात जाहीर होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

https://ift.tt/X0jS6yW

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: